Narhe murder : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नदी पात्रात एका महिलेचे डोके, हात पाय कापून तिचे धड फेकून देण्यात आले होते. ही घटना ताजी असतांना एका डिलिव्हरी बॉयने आपल्या मित्राची किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून हत्या केली आहे. ही सिंहगड रोड येथील नऱ्हे येथे घडली आहे. रेनकोटवरून झालेल्या वादातून मित्राने मित्राची हत्या केली आहे.
आदित्य वाघमारे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सुरेश भिलारे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य व सुरेश हे दोघे मित्र आहेत. हे दोघेही ते एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करतात तर संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. ही दोघंही मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. ते दोघांना एका महिन्यापासून ओळखत होते. या प्रकरणी आदित्यच्या मित्राने तक्रार दिली आहे.
आदित्य व संतोष हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. सध्या पुण्यात पाऊस सुरू आहे. यामुळे त्यांचा रेनकोटवरून वाद झाला. हा रेनकोट आदित्यला डॉमिनोजमधील एका महिलेने दिला, मात्र, सुरेशने हा रेनकोट आदित्यला काढायला लावला. यावेळी त्यांच्यात वाद झाले व तो आदित्यच्या बोटाला चावला. दरम्यान, आदित्यने त्याच्या रूममेटला याबाबत माहिती दिली. तसेच वाद मिटवण्यासाठी आदित्यने सुरेशला रात्री फोन केला. सुरेशने फोनवर बोलण्यास नकार देत नऱ्हे येथे असलेल्या हॉटेल मराठा येथे भेटायला येण्यास आदित्यला बोलावले. यावेळी, फिर्याद प्रवीण मोरे, आदित्य, रतन शिंगाडे, सचिन तांगडे हे सर्व जण सुरेशला भेटायला हॉटेल मराठा येथे गेले. मात्र, या ठिकाणी त्यांच्यावरील वाद आणखी पेटला. सुरेशने आदित्यला शिवी दिली. यामुळे चिडलेल्या आदित्यने सुरेशच्या कानाखाली मारली.
यामुळे सुरेश भिलारेने त्याच्या पँटच्या खिशातील चाकू काढून आदित्यच्या पोटात खुपसला. जखमी आदित्य झिल कॉलेजच्या दिशेने पळाला. सुरेश भिलारे देखील त्याच्या मागे पळाला व पुन्हा त्याने त्याच्यावर चाकूने वार केले. यामुळे आदित्य गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. यावेळी आदित्यचे मित्र घटनास्थळी पोहचले. यावेळी भिलारेने त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून पळ काढला. आदित्यच्या मित्रांनी त्याला दवाखान्यात भरती केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी आरोपी सुरेश भिलारेला अटक केली आहे.