पुण्यात पोर्शे कार अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू असताना पुण्यात आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका संगणक अभियंता तरुणाने आपल्या आईची हत्या केली आहे. कोंढव्यातील एका सोसायटीत ही खळबळजनक घटना घडली. आईचा खून करून संगणक अभियंता मुलगा पसार झाला आहे. आरोपीला दारूचे व्यसन होते. या व्यसनापायीच त्याने आपल्या जन्मदात्रीलाच संपवलं. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
लता आल्फ्रेड बेंझामिन (वय ७३, रा. कुबेरा गार्डन सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मिलिंद बेंझामिन (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. घटनेपासून मिलिंद फरार असून त्याची मोठी बहीण डॉर्थी मोजेस पनमोजेस (वय ४९, रा. सोलेस पार्क, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डॉर्थी या शिक्षिका आहेत. लता यांच्या पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. लता यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुली सुश्मिता आणि डॉर्थी विवाहित आहेत. लता आपला मुलगा मिलिंद एनआयबीएम रस्त्यावरील कुबेरा गार्डन सोसायटीत रहात होत्या.
मिलिंद संगणक अभियंता असून तो बंगळुरूतील एका आयटी कंपनीत नोकरीला होता. मात्र कोरोना महामारीत त्याची नोकरी गेली. त्यानंतर तो पुण्यात परत आला. तीन वर्षांपासून तो बेकार होता. नोकरी गेल्यानंतर तो दारुच्या आहारी गेला होता. दारूच्या व्यसनापायी त्याचा आईशी नेहमी वाद व्हायचा. निवृत्तीनंतर लता एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या वेतनातून घरातील खर्च भागवला जायचा.
२६ मे रोजी डॉर्थी यांनी आईशी संपर्क साधला. त्यानंतर तीन दिवस संपर्क न झाल्याने मंगळवारी (२८ मे) सायंकाळी लता यांच्या खोलीतून दुर्गंध येत असल्याची माहिती रहिवाशांनी डॉर्थी आणि त्यांची बहीण सुश्मिता यांना दिली. त्यानंतर लता यांच्या दोन्ही मुली रात्री त्यांच्या घरी गेले व याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रसाधनगृहातील दरवाज्यावर मिलिंदने ‘मॉम इज इनसाइड डोन्ट गो’ असे लिहिले होते. प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडल्यानंतर लता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे उघडकीस आले. मिलिंद आईचा मोबाइल संच घेऊन घरातून पसार झाल्याचे उघडकीस आले.
संबंधित बातम्या