मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून केली हत्या

Pune News : धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून केली हत्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 08, 2024 12:06 AM IST

Pune Crime News : कर्जबाजारीपणातून मित्रांनीच तरुणीचे अपहरण केले व नंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून केली हत्या
खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून केली हत्या

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले व नंतर तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी तरुणीचा मृतदेह सुपा परिसरातील एका शेतात पुरून टाकला. मृत तरुणी मूळची लातूर येथील असून शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती.तिच्या मित्रांनीच तिचे अपहरण करून तिची हत्या केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

तरुणीचा खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयांना फोन केला व मुलगी जिवंत हवी असेल तर आम्ही सांगतो तितके पैसे द्या, असे म्हणत खंडणीची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.  याप्रकरणी पोलिसांनी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तीन आरोपींना अटक केली आहे. मृत भाग्यश्रीचे वडील सूर्यकांत सुडे यांनी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची व तिचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. 

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील असलेली भाग्यश्री पुण्यातील वाघोली परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण घेत होती. ३० मार्चपासून ती बेपत्ता होती. विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून रात्री ९ च्या सुमारास ती बेपत्ता झाली होती. बराच वेळ झाला तरी मुलीशी संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी पुण्यात येऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान  भाग्यश्रीच्या वडिलांच्या फोनवर खंडणीसाठी मेसेज आला होता. ९ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती.

मुलीच्या वडिलांनी याची तक्रार पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तरुणीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन तरुणांना अटक केली आहे. सर्व आरोपी मृत तरुणीचे मित्र आहेत. ३० मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले व त्याच रात्री तिचा खून केला. नंतर पकडले जाण्याच्या भीतीने पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा येथील एका शेतात खड्डा खणून मृतदेह पुरून टाकला.

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आर्थिक कर्जबाजारीपणातून आरोपींनी हा गुन्हा केला आहे. भाग्यश्रीच्या जवळचे हे मित्र असल्याने त्यांना तिच्या घरच्या परिस्थितीची जाणीव होती. तिचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज होता. त्यातूनच त्यांनी तिच्या अपहरणाचा प्लॅन रचला व नंतर पकडले जाण्याच्या भीतीने तिलाच संपवले.या प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग