पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्याय तीन दिवसात पुण्यात तीन हत्यांच्या घटना घडल्या आहेत.यातच आता सिंहगड रस्त्यावर किरकटवाडी फाट्यावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. सागर चव्हाण (वय १८, रा. लक्ष्मीनगर, कोथरुड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनवून तरुणाशी महिनाभर चॅटिंग करत होते. आज सकाळी त्यांना तरुणाला भेटायला बोलावले आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी दोन आरोपींना पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हर्षद वांजळे व धनराज पाटील अशी अटक केलेल्यांनी नावे आहेत.
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्याजवळील सीडब्लुपीआरएस कॉलनी गेटच्या समोर बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या तरुणावर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी एक महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनवून जखमी तरुणाला रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी मुलीच्या नावाने त्याच्याशी महिनाभर चॅटिंग केले. मंगळवारी रात्री त्याच्याशी बोलणे झाले व त्यांनी त्याला खडकवासला परिसरात भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकटवाडी फाट्याजवळ येऊन थांबला. त्याने तू कधी येतेस आम्ही पोहोचलोय, असा मेसेज करुन करंट लोकेशन शेअर केले आणि पुढच्या काही मिनिटांतच त्याचा घात झाला.
सागर चव्हाण मित्रासोबत रस्त्यावर थांबलेला असताना अचानक दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोराने लाथ मारून सागर चव्हाणला खाली पाडले व त्यानंतर त्याच्यावर कोयत्यांनी सपासप वार केले. यात सागरच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी दुचाकी घटनास्थळीच सोडून किरकटवाडी गावच्या दिशेने फरार झाले.
आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी अत्यंत शांत डोक्याने मुलीच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला आपल्या जाळ्यात ओढले आणि प्रेमाचे नाटक करुन भेटायला बोलावले. आरोपींनी पावरलेली दुचाकी जुनी असून त्यावर नंबर प्लेटही नाही. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून सुनियोजित पद्धतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.