मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : बहिष्कृत कुटुंबाला पुन्हा जातीत घेण्यासाठी १ लाख मागितले; पोलिसांनी 'असा' दिला दणका

Pune Crime : बहिष्कृत कुटुंबाला पुन्हा जातीत घेण्यासाठी १ लाख मागितले; पोलिसांनी 'असा' दिला दणका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 25, 2023 02:06 PM IST

Pune Crime : पुण्यात आंतर जातीय विवाह केल्यामुळे जात पंचायतीने एका कुटुंबाला तब्बल २३ वर्षांपासून बहिष्कृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : पुण्यात एकाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे जातपंचायतीने एका कुटुंबाला बहिष्कृत केल्याची घटना पुढे आली आहे. तब्बल २३ वर्षांपासून हे कुटुंब बहिष्कृत राहिले. जातीत पुन्हा समावेश करून घेण्यासाठी पंचांनी १ लाख रुपये मागीतल्याने, श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जात पंचायतीतील पंचांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश नेमीचंद डांगी (वय ४६, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, हडपसर) यांनी या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ताराचंद काळूराम ओझा (रा. गंज पेठ), भरत नेमीचंद मेवाणी (रा. अरण्येश्वर), मोतीला भोमाराम शर्मा डांगी (रा. खिवाडा, जि. पाली, राजस्थान), प्रकाश लालूराम बोलद्रा उर्फ शर्मा (रा. पद्मावती), संतोष उणेचा (रा. भवानी पेठ), बाळू शंकरलाल डांगी (रा. पाषाण), भवरलाल डांगी (रा. मारवाड जंक्शन, राजस्थान), हेमाराम ओझा (रा. सिनला, जोधपूर, राजस्थान) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे श्री गौड ब्राह्मण समाजातील आहेत. ते रिक्षाचालक आहेत. १९९८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना जात पंचायतीने बहिष्कृत केले होते. समाजाकडून मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला असून या साठी बिबवेवाडीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. फिर्यादी देखील या मंदिरात गेले होते. यावेळी, पंचांनी डांगी यांना मंदिरातील बैठकीत कसा आला, तुला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. तू निघून जा, असे सांगितले. दरम्यान, डांगी यांनी समाजात परत घ्या, असे पंचांना सांगितले. समाजाचे अध्यक्ष मोतीला शर्मा, भरत मावाणी यांच्याकडे अर्ज केला होता. समाजात पुन्हा यायचे असेल तर एक लाख २५ हजार रुपये दंड मागण्यात आला. यामुळे डांगी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग