पुण्यात चाललंय काय! २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न, जेसीबीने खड्डा खणून अंगावर टाकली माती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात चाललंय काय! २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न, जेसीबीने खड्डा खणून अंगावर टाकली माती

पुण्यात चाललंय काय! २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न, जेसीबीने खड्डा खणून अंगावर टाकली माती

Updated May 31, 2024 04:44 PM IST

Punecrime news : शेत जमिनीच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील राजगड तालुक्यामधील कोंढवळे गावात घडला आहे.

२२ वर्षीय तरुणीला जमिनीत जिंवत गाडण्याचा प्रयत्न
२२ वर्षीय तरुणीला जमिनीत जिंवत गाडण्याचा प्रयत्न

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोर्शे गाडीने दोन आयटी प्रोफेशनल्सना उडवल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेत जमिनीच्या वादातून एका २२ वर्षीय तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील राजगड तालुक्यामधील कोंढवळे गावात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींविरोधात भादंवि संहितेच्या ३०७ कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर आणि उमेश जयस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ करून धमकावणे आदि कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जिंवत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. २५ ते ३० जणांचा जमाव ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आला होता. यावेळी त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तरुणीच्या अंगावर माती टाकून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्यांनी कंबरेपर्यंत जमिनीत पुरले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने आपल्या आईसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ ते ३० नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले होते. यावेळी तरुणी आणि त्या  नागरिकांमध्ये वाद झाला. त्यांनतर त्यांनी तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. या  या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत जमिनीत गाडली गेल्याचे दिसते. याबाबत वेल्हा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणीने जमिनीवरील ताबा सोडण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी तरुणीच्या अंगावर ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून तिला त्याच जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. २००६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जागेचे भूसंपादन केले. मात्र, त्या जागेचा मोबदला या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना मिळाला नसल्याचे सांगितले जातंय. त्यामुळे त्यांनी या जागेवरील ताबा सोडण्यास नकार दिला. मात्र ज्यांनी ही जागा घेतली आहे, त्या मालकाने बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी २२ वर्षीय तरुणीला गाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

धक्कादायक म्हणजे, जमिनीचा ताबा घेण्यासाठी मुंबईवरुन गुंड मागवल्याचाही प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद असून गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर आणि जेसीबीदेखील जप्त करण्यात आले आहेत. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर