पुणे : बंगळुरू येथे खोदकाम करताना सोन्याच्या विटा आणि हीरे सापडले असून त्याची विक्री करायची आहे असे सांगत एका आयटी कंपनीच्या संचालकाकडून १० लाख रुपये घेऊन त्यांना खोटी सोन्याची विट आणि हीरे देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
भीमा गुलशन सोलंकी (मूळ रा. बडोदा, गुजरात, सध्या रा. देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका आयटी कंपनीच्या संचालकाने दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मुंबईत राहायला असून ते काही दिवसांपूर्वी ते लोणावळा येथे आले होते. या ठिकाणी त्यांना भीमा सोलंकी भेटला. त्याने फिर्यादी यांना बंगळुरू येथे एक जुनी वास्तू पाडण्यात आली. तेथे त्याला सोन्याच्या विटा आणि हिरे असलेली पिशवी सापडली असे सांगत ते विकायचे आहे असे सांगितले. दरम्यान, आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना ते विकत घेण्यास सांगितले. त्यांच्याकडून दहा लाख रुपये सोलंकीने घेतले. मात्र, त्यांना खोट्या सोन्याच्या विटा आणि हिरे देऊन सोलंकी पसार झाला.
त्यांनी सोलंकी याने दिलेल्या सोन्याच्या विटा आणि हीरे तपासून पहिले असता ते खोटे निघाले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त मितेश घट्टे यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले. लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक नेताजी गंधारे, सचिन रावळ, प्रकाश वाघमारे, हनुमंत पासलकर आदींनी सोलंकीला सापळा लावून ताब्यात घेतले.