Bopdev Ghat Rape case: पुण्यात बोपदेव घाट येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य पुन्हा हादरले. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. पोलिसांची विविध पथके त्यांचा शोध घेत असून तब्बल बोपदेव घाट परिसरातील ६. ते ७० किमीची सीसीटीव्ही शोधले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने महत्वाचे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच आरोपींची नावे व माहिती देण्याऱ्याबाबत गुप्तता देखील पाळली जाणार आहे.
बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी २५ पेक्षा अधिक पथके कम करत आहेत. पोलिसांनी आता पर्यंत ३ हजार फोन क्रमांक आणि २०० पेक्षा अधिक संशयित आरोपींची कसून चौकशी केली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या वर्णनानुसार संशयित आरोपींची रेखाचित्र देखील काढण्यात आले असून त्या द्वारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांना या प्रकरणी आरोपीची ठोस माहिती मिळाली नाही. यामुळे राज्य सरकारने आरोपींची माहीती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
गुरुवारी रात्री ११ वाजता पीडित तरुणी व तिचा मित्र हे बोपदेव घाटात टेबल टॉप पॉइंटवर फिरायला गेले होते. यावेळी तिघांनी या दोघांना हटकत त्यांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवत तरुणाला मारहाण केली. त्याचा शर्ट काढला व तरुणी जवळील सर्व मौल्यवान वस्तु त्यांनी घेतल्या. यानंतर एकाने तरुणाचे हात पाय बांधून तरुणीला दुसरीकडे नेत तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित तरुणी ही २१ वर्षांची असून ती पुण्यात शिक्षणासाठी आली आहे.
या घटनेनंतर पुण्यातील टेकड्यांवर सर्च लाइट बसवण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व टेकड्यांवर हे सर्च लाइट बसवले जाणार आहेत.