मित्रांसोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (०३ ऑक्टोबर) रात्री घडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तरुणीच्या मित्राला मारहाण करत त्याच्यासमोरच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. कोंढव्यातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपीचं स्केचही जारी केलं आहे. या व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे पोलिसांनी श्वानपथकाकडून पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी १० पथकं तयार करण्यात आली आहेत. पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगावचा आहे. हे दोघंही पुण्यातील एका हॉटेल मॅनेजमेंट शिकवणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेतात.
बोपदेव घाटात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांना याची माहिती पहाटे ५ वाजता समजली. अद्याप आरोपींची ओळख पटली नाही. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यांनी तिच्या मित्राला बांधून ठेवलं होतं. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोनच दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात एकाने मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीचं कारमधून अपहरण केलं होतं. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गाडीतच तिचा विनयभंग केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच बोपदेव घाटात बलात्काराची घटना घडली आहे.
बोपदेव घाट निर्जन ठिकाण असल्याने तसेच नेटवर्क नसल्याने कोणतीही मदत पीडित मुलीस मिळू शकली नाही. या घटनेनंतर पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केलाय आहे. पीडितेच्या मित्राच्या सांगण्यावरून आरोपींचे स्केचेस बनवून तपास केला जात आहे.
संबंधित बातम्या