Pune Chakan Rape : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली आणि मुलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. खेड तालुक्यातील चाकण येथील उद्योग नागरिक एका मामाने आपल्या ४ वर्षांच्या सख्ख्या भाचीला झोपेतून उचलून तिला निर्जन स्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाच्चीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात आलाय. सख्ख्या मामानेच अत्याचार केल्याने सर्वांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची माहिती अशी की, सख्ख्या मामाने पीडित ४ वर्षांची मुलगी झोपली असतांना तिला झोपेतून उचलून नेत तिला निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिषकुमार सिंग असे अत्याचार करणाऱ्या आरोपी मामाचे नाव आहे. पीडित मुलीचे आई वडील व नातेवाईक हे बिहार येथील रहिवाशी आहेत. मुलीचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला आहे. तर आई देखील कामानिमित्त बाहेर गेली होती. दरम्यान, यावेळी पीडित ४ वर्षीय मुलगी आणि तिचा मामा घरी एकटेच होते. यावेळी मुलगी ही घरी झोपली असतांना मामाने मुलीला उचलून घराबाहेर निर्जनस्थळी नेले. यावेळी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच मुलीला तेथेच सोडून आरोपी फरार झाला.
पीडित मुलीची आई घरी आल्यावर तिने मुलीचा शोध घेतला. यावेळी ती तिला घरी दिसली नाही. तिने आजूबाजुला शोध घेतला असता, मुलगी एका ठिकाणी तिला रडताना दिसली. यावेळी तिने मुलीला विचारले असता तिने तिच्यावर झालेला प्रसंग आईला सांगितला. यावेळी आईने थेट महाळूंगे पोलिस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दिली.
या बाबत डीसीपी शिवाजी पवार यांनी माहिती देतांना सांगितले की, आज सकाळी माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर प्राथमिक चौकशी केल्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार झाल्याचं समजलं. या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून आरोपी हा मुलीचा नातेवाईक असल्याचं पुढं आलं आहे. पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.