Pune Bibvewadi Murder : पुण्यात खुनाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बिबवेवाडी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बसवराज गजेंत्रे (वय २६, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे खून झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पुढील अप्पर इंदिरानगर परिसरात एका व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्या संकल्पनेतून हे व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी गाळे बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती ओसवाल यांना मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. बिबवेवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा केला.
या ठिकाणी त्यांना एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दरम्यान, या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. बसवराज हा या व्यापारी संकुलात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता.
बसववराज व त्याचे मित्र रविवारी रात्री गाळ्यात दारु पित होते. यावेळी बसवराज याने नात्यातील एका महिलेविषयी वाईट बोलल्याने त्याचा त्याच्या मित्रांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात रागाच्या भरात त्याच्या मित्रांनी बसवराज याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यानंतर सर्व फरार झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.