Pune News: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका महिला पोलिसाने मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित महिलेने कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दिल्यानंतर महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अनघा ढवळ असे निलंबित झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. आरोपी महिला पुण्यातील वाहतूक पोलीस विभागात कार्यरत होती. मिळालेल्या माहितीनुसार, अनघा ढवळ ही फिर्यादी महिलेला तू परपुरुषासोबत शारिरीक संबंध ठेव नाहीतर, नाहीतर तुझ्या घरातील लोकांना ठार मारू, अशी धमकी दिली. तसेच मी पुण्याची लोकल आहे, माझी गुंडांबरोबर ओळख आहे. आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो. आम्ही ब्लॅक मनीचे लीगलमध्ये रुपांतर करतो. आमचे ९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तुझ्या नवऱ्याला ४० ते ५० लाख रुपये मिळतील, असेही ढवळे हिने महिलेला सांगितले. याप्रकरणी अनघा ढवळेचे निलंबन करण्यात आले आहे.
पत्नीशी झालेल्या वादातून पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विरार येथील ३८ वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली. मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाळ राठोड याला दारू पिण्याची सवय होती आणि तो दारू पिऊन घरी परतल्यानंतर घरच्यांना त्रास देत असे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास महिलेचा पतीसह वाद झाला. रागाच्या भरात त्याने चाकू काढून तिची चाकूने भोसकून हत्या केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पथक रवाना करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०३ (१) (खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी एका ६१ वर्षीय महिलेची ३.०४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ठाण्यातील रहिवासी असलेल्या या महिलेशी कुरिअर फर्म, मुंबई पोलिसांचा सायबर क्राईम सेल आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून संपर्क साधला होता. संशयास्पद हालचालींसाठी तिच्या बँक खात्यांची तपासणी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आणि पाच ऑनलाइन व्यवहारांद्वारे ३.०४ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने शुक्रवारी ठाणे नगर पोलिस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास सुरू आहे.