Pune PMC structural audit of 50 statues : मालवण येथील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, हा पुतळा ८ महिन्यातच कोसळला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहे. या घटनेमुळे महायुती सरकार अडचणीत आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून भविष्यात शहरात अशी घटना होऊ नये या साठी शहरातील ५० हून अधिक पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पुणे महानगर पालिकेने घेतला आहे.
पुण्यात कर्वे रोड, येरवडा, कसबा पेठ, मध्यवर्ती पेठ परिसर, कोथरूड, मंडई आणि शिवाजीनगर परिसरात राज्य सरकारचा निधी, देणग्या आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एकदा पुतळे बसविण्यात आल्यानंतर त्याकडे प्रशासनाचे लक्ष जात नाही. तसेच पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष केलं जात. फक्त जयंती आणि पुण्यतिथीला पुतळ्याची स्वच्छता होते. त्यानंतर वर्षभर पुतळ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे शहरातील अनेक पुतळे धुळखात पडून आहेत.
उभारण्यात आलेले हे पुतळ्यांसही विविध समुदाय, समाज व संघटनांच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे पुतळा ही खूप संवेदनशील गोष्ट आहे. पुतळ्याची विटंबना होऊ नये, याची काळजी घेतली जाते.
मालवण येथील दुर्घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने, निर्देशने सुरू आहेत. या सर्व प्रकारामुळे महापालिका प्रशासनाने शहरात भविष्यात अशी दुर्घटना टाळावी यासाठी ५० हून अधिक पुतळ्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. इमारत रचना विभागाने अशा पुतळ्यांची माहिती संकलित केली असून सोमवार, १ सप्टेंबरपासून कामाला सुरुवात होणार आहे.
इमारत रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, 'नगरसचिव कार्यालयाकडून ५० पुतळ्यांची माहिती मिळाली आहे. यातील काही पुतळे पुतळ्यांच्या स्वरूपात आहेत, तर काही पूर्ण पुतळे आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट सुरक्षा आणि पुतळ्याच्या अवस्थेचा विचार करून ऑडिट केले जाणार आहे. या पुढे पुतळ्यांची पुरेशी सुरक्षा राखली जाईल आणि जिथे आवश्यक असेल त्या पुतळ्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे देशमुख म्हणाले.
पुण्यात मोठ्या प्रमाणात पुतळे उभारण्यात आले आहे. अनेक चौकात व मोक्याच्या ठिकाणी हे पुतळे उभारण्यात आले आहे. हे पुतळे केवळ पुण्यतिथी आणि व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणार्थ महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी सजवले जातात. त्या विशेष प्रसंगांसाठी रंगरंगोटी आणि साफसफाईच्या कामासाठी निविदा काढल्या जातात आणि त्यानंतर विशेष प्रसंग येईपर्यंत वर्षभर या पुतळ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं.
राज्य सरकारच्या समितीच्या परवानगीशिवाय कोणत्याही खासगी मालमत्तेत पुतळे बसवू नयेत तसेच पुतळा बसवलेला भूखंड वादग्रस्त नसावा, असे नियमात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कसून तपासणी करून परवानगी द्यावी, असे नियमात म्हटले आहे. सरकारी जागेवर पुतळा बसवायचा असेल तर संबंधित विभागांच्या आवश्यक परवानग्या आवश्यक असतात. हा पुतळा वाहतुकीच्या आड येऊ नये. अशी माहिती नागरिक हक्क कार्यकर्त्या जयमाला धनकीकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, 'हे पुतळे आपल्या इतिहासाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे महापालिकेने त्यांचे सुरक्षितता व ते दीर्घकालीन चांगले राहतील याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर पुतळे स्वच्छ राहतील याची ही काळजी घेतली पाहिजे. मनपाच्या अखत्यारीतील पुतळे अस्वच्छ असून त्यांची लवकरात लवकर साफसफाई होणे गरजेचे आहे. स्ट्रक्चरल ऑडिट हे स्वागतार्ह पाऊल असून यामुळे त्यांची सुरक्षितता आणि स्थैर्य निश्चित होईल, असेही त्या म्हणाल्या.