Pune balloons Issue : पुण्यात कोणतेही सण, उत्सव असो जल्लोषात साजरे केले जाते. सध्या पुण्यात वाढदिवस, नवीन वर्ष तसेच कोणताही इव्हेंट असला की आकाशात फुगे सोडले जाते. हे फुगे नगरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. फुग्यांमुळे पर्यावरण दूषित होत असल्याने शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी यावर बंदी घालण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. या सोबतच जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जे फुगे लेटेक्स आणि मायलर (फॉइल-लेपित) पासून बनविलेले असतात त्यामुळे पर्यावरणाला सर्वाधिक हाणी पोहोचते. लेटेक्स फुगे जमिनीत विघटित होत असतांना अनेक घातक रसायने जमिनीत सोडतात. तसेच हे फुगे विघटित होण्यास अनेक वर्षे लागतात. जेव्हा फुगे हवेत सोडले जातात, तेव्हा ते शेवटी जमिनीवर पडून पाण्यात, नद्यांमध्ये पडतात. त्यामुळे जल प्रदूषण देखील होते. मायलर फुगे वीजवाहिन्यांच्या संपर्कात आल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो आणि आग लागू शकते. मायलर फुगे वन्यजीवांना, विशेषत: पक्ष्यांना देखील हानी पोहोचवू शकतात. या प्रकारचे फुगे विघटित होण्यास शेकडो वर्षे लागू शकतात आणि कचरा व प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात.
त्यामुळे या फुग्यां एवजी बायोडिग्रेडेबल फुगे, कागदी कंदील आणि टिश्यू पॉम्पम सह अशा फुग्यांना पर्याय आहेत जे पुन्हा वापरले जाऊ शकतात आणि अधिक पर्यावरणपूरक देखील आहेत. मात्र, पुणे शहरात विविध सण उत्सवात लेटेक्स आणि मायलर या घातक फुग्यांचा सर्रास वापर केला जातो.
माय अर्थ संस्थेचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले, 'आकाशात फुगे सोडणे हे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे उल्लंघन आहे. शिवाय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार फुगे सोडल्याने विपरित परिणाम होणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात विशेषत: नववर्षाच्या पूर्वसंध्येला फुग्यांचा वापर लक्षात घेऊन पुणे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई न केल्यास आम्ही राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) खटला दाखल करू, असे घरात म्हणाले.