मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bridge Update : चांदणी चौकातील राडारोडा अखेर हटवला; तब्बल ९ तासांनी वाहतूक झाली पूर्ववत

Pune Bridge Update : चांदणी चौकातील राडारोडा अखेर हटवला; तब्बल ९ तासांनी वाहतूक झाली पूर्ववत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 02, 2022 07:02 PM IST

Pune Chandani Bridge Update : पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील पूल रविवारी पहाटे १ वाजता पाडण्यात आला. या नंतर जेसीबीच्या साह्याने येथील राडा रोडा हटवण्यात आला. तब्बल ९ तास सलग येथील राडा रोडा काढण्यात आल्याने आज सकाळी ११ वाजता या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

चांदणी चौक
चांदणी चौक

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील पूल अखेर जमीनदोस्त झाला. रात्री १ वाजता हा पूल पाडण्यात आला. तब्बल ६०० किलो स्फोटके वापरुन देखील हा पूल पूर्ण पडला नसल्याने अखेर जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने हा पूल पाडण्यात आला. रात्री २ वाजून ३४ मिनिटांनी संपूर्ण पूल कोसळला. त्यानंतर राडा रोडा हटवण्याचे काम सुरू होते. तब्बल ९ तास हे काम चालले. यानंतर आज सकाळी ११ वाजता हा रस्त्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनातर्फे शनिवारी रात्री ११ वाजता पासून या मार्गवारील वाहतूक ही बंद करण्यात आली होती. रात्री १ वाजता पूल पाडल्यावर ८ वाजेपर्यन्त संपूर्ण राडारोडा हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार होता. मात्र, हे काम १०.३० पर्यन्त चालल्याने हा रस्ता ११ वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये, यासाठी तब्बल ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

राडारोडा काढण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यात १६ एक्सकैवेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी तब्बल ९ ते १० तास सलग काम करून पाडण्यात आलेल्या पूलाचा राडारोडा हा बाजूला केला. या कामाला थोडा विलंब झाल्याने हा मार्ग सकाळी ८ एवजी ११ वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सध्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरची वाहतूक ही सुरळीत झाली आहे. लवकरच या ठिकाणी पूल बांधण्याचं काम सुरु होणार आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग