Pune Accident : पुण्यात चाकण शिक्रापुर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले. यात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या भीषण अपघाताचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात दुपारी भीषण अपघात झाला. चाकण शिक्रापुर मार्गावर भरधाव कंटेनरने वाहनांना धडक दिली. या घटनेत काही कार व दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीनं जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या कंटेनरने चाकणमध्ये दोन महिलांना उडवले. त्यांनतर पुढे मेदनकर वाडी फाटा येथे पाच वर्षांच्या मुलीला या कंटेनरने धडक दिली. यानंतर शेल पिंपळगावमध्ये काही कारला व दुचाकींना या कंटेनरने धडक दिली. हा कंटेकर पुढेही या मार्गावर अनेक वाहनांना उडवत भरधाव वेगाने पुढे जात होता. बहुळ गावमध्ये पोलिसांच्या कारला देखील हा कंटेनर धडकला. यात पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. चौफुलामध्ये आणखी एका कारला व दुचाकीला या कंटेनरने धडक दिली. अपघातानंतरचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. यात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने अपघात जीवित हानी झाल्याची माहिती नाही.
चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात या मालवाहू कंटेकरने अनेकांना उडवलं आहे. या घटनेत मोठे नुकसान झाले आहे. घतेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून त्याला चांगलाच चोप दिला आहे. शिक्रापूर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर चालक अकिब खान (रा.हरियाना) यास मारहाण केलेली असून त्यास उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले आहे. या अपघातात एका महिलेला व एका मुलीला गंभीर दुखापत झालेली आहे. त्याचप्रमाणे सदर कंटेनरने रस्त्याने जाणाऱ्या २० ते २५ लहान मोठ्या वाहनांना ठोस मारून नुकसान केलेले आहे.
संबंधित बातम्या