मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Pune Bypolls Elections Ncp Leader Rohit Pawar On Mns President Raj Thackeray

Pune Bypolls Elections: पुणे पोटनिवडणुकीवरून रोहित पवारांची राज ठाकरे यांच्यावर टीका

Rohit Pawar On Raj Thackeray
Rohit Pawar On Raj Thackeray
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Feb 06, 2023 12:44 PM IST

Rohit Pawar Criticized Raj Thackeray: कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Rohit Pawar On Raj Thackeray: कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसने आपपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे सर्व पक्षांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले. मात्र, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मी राज ठाकरेंच्या स्टाईलचा चाहता आहे. मात्र, आता त्यांच्यावर भाजपचा प्रभाव पडताना दिसत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी म्हटलंय की, महाविकास आघाडीचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. पण पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरच्या निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी पत्र काढलं नाही. हा भेदभाव का करण्यात आला, हे राज ठाकरेच सांगू शकतात. मी राज ठाकरेंच्या स्टाईलचा चाहता आहे. भाजपाचा प्रभाव राज ठाकरेंवर पडत असल्याचे दिसत आहे. ही गोष्ट अनेकांना भावत नाही. त्यांनी स्वत:ची स्टाईल जपली पाहिजे. भाजपाच्या नादी लागलेले पक्ष असो अथवा व्यक्ती दोन्ही संपले आहेत”, अशा शब्दात रोहित पवारने राज ठाकरे यांना चिमटा काढला.

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिले?

"महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होते तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, 'तसाच कील त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन इालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच अस नाही", असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहले आहे.

"अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या,त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान केलं होत. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यानी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाया पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात", असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून सर्वपक्षीयांना केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांना फोन केला होता.

WhatsApp channel