pune businessman murdered in karnataka : कर्नाटकात पुण्यातील एका व्यावसायिकाची त्याच्या पत्नीसमोरच हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी घडली. या घटनेत हल्लेखोरांनी त्याच्या पत्नीवर देखील वार केले असून ती देखील गंभीर जखमी झाली आहे. मृत व्यापारी हा कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हंकोन या गावात राहत होता.
विनायक नाईक उर्फ राजू (वय ५८) असे ठार झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर त्याची पत्नी वृषाली विनायक नाईक (वय ५०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. विनायक ही पुण्यात इलेक्ट्रिकल वस्तुंचा व्यवसाय करत असे. कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक वैमनस्य यातून विनायक यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे शिवाय या खून प्रकरणात अंडरवर्ल्डचाही सहभाग असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
उत्तरा कन्नड जिल्हा पोलिसांनी सांगितले की, नाईक यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विनायक आणि वृषाली ३ सप्टेंबर रोजी गावातील मंदिराच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. यानंतर ते रविवारी कारने पुन्हा पुण्याला परतणार होते. कारवार जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या मूळ गावात विनायकने नवे घर बांधले होते. विनायक नाईक यांची बहीण श्रुतिका राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मोठा भाऊ माधव काशिनाथ नाईक हे मुंबईहून रेल्वेने घरी परत आले होते. तर विनायक आणि त्यांची पत्नी त्यांच्या कारने परत येण्यासाठी निघाले होते.
श्रुतिकाने सांगितले की, ते तिची आई सुरेखा काशिनाथ नाईक यांच्या पुण्यतिथीला कारवारला आले होते. कुटुंबीयांनी शनिवारी पूजा केली. यानंतर श्रुतिका कारवार येथील त्यांच्या सासरच्या घरी परतल्या. विनायक आणि वृषाली यांनी रविवारी सकाळी ६ वाजता पुण्याला निघणार असल्याचे सांगितले. श्रुतिका यांच्या म्हणण्यानुसार तिने विनायकला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. यानंतर पहाटे ५.४५ च्या सुमारास वृषालीला फोन करून विनायकची हत्या झाल्याची माहिती कोणीतरी दिली.
यानंतर श्रुतिकाने तातडीने मोठा भाऊ माधव नाईक याला ही माहिती दिली. या हल्ल्यात विनायकचा जागीच मृत्यू झाला, तर वृषालीला कारवार येथील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. विनायक आणि वृषाली पहाटे ५.१५ वाजता उठल्याचे तपासात समोर आले आहे. काही सशस्त्र हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. वृषालीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. चितकुला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर कन्नड एसपी एम नारायण यांनी सांगितले की त्यांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली आहेत. विनायकच्या घराच्या आजूबाजूला इतर अनेक घरे आहेत, पण त्यामध्ये कोणीही राहत नाही. पोलिसांना ६.२५ वाजता या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वृषाली या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, त्या देखील गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी अजून माहिती गोळा करायची आहे.
या जोडप्याला एक मुलगा देखील आहे, जो अमेरिकेत शिकतो. आज तो कर्नाटकात पोहोचण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे शोधण्यासाठी ते विनायक आणि वृषालीच्या फोन कॉल्सची माहिती घेतली जात आहे. घरात दरोडा पडला नसून हल्लेखोरांनी विनायकची हत्या करून तेथून पळ काढला. याशिवाय त्याने वृषालीलाही मारले नाही. यामागे व्यवसाय किंवा कुटुंबाशी संबंधित वाद आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय या घटनेत मुंबई किंवा अंडरवर्ल्डचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी म्हटलं आहे.