Pune Burger king case : सध्या फास्टफूडचा जमाना आहे. तरुणाई बर्गर आणि फ्राईज खण्याला प्रसंती देतात. बर्गर म्हटलं की बर्गर किंग प्राधान्याने पुढे येते. मात्र, परदेशातील असलेल्या या बर्गर किंगला पुण्यातील कॅम्प परिसरातील देशी बर्गर किंगने आव्हान दिले. सामान नावावरून सुरू असलेला हा लढा तब्बल १३ वर्षांपासून कोर्टात प्रलंबित होता. या लढाईत पुण्यातील बर्गर किंगने बाजी मारली असून आपणच खरे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या ‘बर्गर किंग’ने या प्रक्ररणी पुणे न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी पुण्यातील स्थानिक ‘बर्गर किंग’च्या बाजूने निकाल दिला आहे.
अमेरिकेतील ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ने पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंग विरोधात सामान नाव असल्याने खटला दाखल केला होता. अमेरिकेच्या बर्गर किंगचे प्रतिनिधी पंकज पाहुजा यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्क व लष्कर भागातील ‘मेसर्स बर्गर किंग’चे मालक अनाहिता व शापूर इराणी यांच्याविरुद्ध हा खटला पुण्यातील दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणी पुण्यातील ‘बर्गर किंग’चे वकील ॲड. ए. डी. सरवटे, ॲड. सृष्टी आंगणे व ॲड. राहुल परदेशी यांनी बाजू लढवली.
अमेरिकेच्या बर्गर किंग कॉर्पोरेशनने खटला दाखल करतांना ‘ट्रेडमार्क’चे उल्लंघन केल्या प्रकरणी नुकसान भरपाई मागीतली. तसेच ‘बर्गर किंग’नावाच्या वापरावर देखील मनाई केली. खटल्या दरम्यान, अमेरिकेच्या बर्गर किंगचा इतिहास मांडण्यात आला. तब्बल १९५४ पासून अमेरिकन कंपनी बर्गर किंग ही कंपनी ही जेम्स मॅक्लामोर व डेव्हिड एडगर्टन यांनी सुरू केली. यानंतर या उपहार गृहांची मोठी साखळी अमेरिकेसह जगभरात शंभराहून अधिक देशांत वाढली. कंपनीच्या जगभरात १३ हजार पेक्षा जास्त शाखा आहेत. भारतात देखील त्यांनी त्यांच्या शाखा सुरू केल्या. पुण्यात देखील कंपनीचे अनेक आउटलेट आहेत. कंपनीने २०१४ पासून आधी दिल्ली व नंतर मुंबई आणि पुण्यात हे आउटलेट सुरू केले. मात्र, या कंपनीला २००८ पासून पुण्यात याच नावाने सुरुवातीपासून एक उपाहारगृह सुरू असल्याचं कळाले.
या विरोधात २००९ मध्ये जून महिन्यात आहुजा यांच्या मार्फत पुण्यातील ‘बर्गर किंग’ला नोटिस देऊन त्यांचा व्यवसाय थांबवून हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. मात्र, पुण्यातील बर्गर किंग विरोधात अमेरिकेतील कंपनीने कंपनीच्या व्यवसायचिन्हाचा वापर करणे तसेच कंपनीच्या प्रतिष्ठेला पोहोचवणारे म्हटले होते. पण तडजोड न झाल्याने अखेर अमेरिकन बर्गर किंग कॉर्पोरेशनने पुण्यातील न्यायालयात हा खटला दाखल केला. तब्बल १३ वर्षे हा खटला चालला. जिल्हा न्यायाधीश वेदपाठक यांनी अमेरिकन कंपनी ‘बर्गर किंग’ची याचिका फेटाळली. तसेच पुण्यातील ‘बर्गर किंग’ हे व्यवसाय चिन्ह १९९२-१९९३ पासून वापरत असल्याचं स्पष्ट केलं. अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ने भारतात या नावाने उपाहारगृह व्यवसाय नोंदणी केली, त्या आधीपासून पुण्याचे ‘बर्गर किंग’ हे व्यवसायचिन्ह वापरत असल्याचा निकाल देत अमेरिकन बर्गर किंगचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. या साठी पुण्यातील ‘बर्गर किंग’चे वकील ॲड. सरवटे यांच्यासह ॲड. अंगणे आणि ॲड. परदेशी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या या युक्तिवादाची आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्याची दखल घेत हा निकाल देण्यात आला.