मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Girish Bapat : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन

Girish Bapat : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 29, 2023 01:12 PM IST

Girish Bapat Passed Away : लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन

Girish Bapat Death News : पुण्याचे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीष बापट यांचे वयाच्या ७४ व्या  वर्षी दीनानाथ हॅास्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती आज सकाळी खालावली होती.  त्यांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना सुरवातीला लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.  बापटांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला होता. त्यांच्या निधनाने राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला. 

नगरसेवक ते आमदार खासदार झालेल्या बापट यांनी पुणे शहर व पुणे जिल्ह्यात भाजपचे स्थान भक्कम केले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. याआधी त्यांना डिसेंबर २०२२ मध्ये दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कसबा पेठ पोट निवडणूकीत आजारी असतांनाही त्यांनी व्हील चेअर वरून  येत प्रचारात सहभाग नोंदवला होता. तसंच त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने नाकात नळीही लावण्यात आली होती. यावेळी त्यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

मोठी राजकीय कारकीर्द

खासदार गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कट्टर स्वयंसेवक होते. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून ते खासदारकीपर्यंत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. १९९५ पासून सलग पाचवेळा गिरीश बापट आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा त्यांनी पराभव करत खासदार झाले होते. भाजपच्या जुन्या फळीतील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून बापट यांची ओळख होती. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे मोलाचे योगदान होते. आणीबाणीच्या काळात बापट यांना १९ महिन्यांचा कारावास झाला होता. ते नाशिक जेलमध्ये होते. १९७३ मध्ये टेल्को कंपनीत काम करताना त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलनं केली होती.

 गिरीश बापट यांचा जन्म ३  सप्टेंबर १९५०  रोजी पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण तळेगाव दाभाडे येथे प्राथमिक शाळेत झाले होते. तर  त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीतून त्यांनी  वाणिज्य शाखेची पदवी घेतली. यानंतर ते  १९७३ मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले होते. 

IPL_Entry_Point

विभाग