Amol Kolhe News: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून विजय मिळवला. यासाठी मंचर येथे अमोल कोल्हेंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. मात्र, याठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. अमोल कोल्हेंनी नागरी सत्कार समारंभात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केल्याने ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केल्याची माहिती समोर येत आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हेंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या सत्कार समारंभात अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम भावी आमदार म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतपाची लाट उसळली. शिवसैनिकांनी सभास्थळावरच घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यावेळी अमोल कोल्हे आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला मिळाली.
अमोल कोल्हे असे म्हणाले की, “जे माझ्या मनात आहे, ते तुम्हाला सत्यात उतरवावे लागेल. गेल्या निवडणुकीत मी म्हणालो होतो की, या माणसाचे नाव देवदत्त आहे की विश्वास? त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये विश्वास जपला. यंदाच्या निवडणुकीमध्ये भलेभले मनात इमले बांधत होते. मात्र, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली आणि आंबेगाव तालुक्यात इतिहास घडवला, ते भावी आमदार देवदत्त निकम साहेब आहेत.”
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही आमचा अपमान झाला.आमची बदनामी केली जात आहे. आम्ही फक्त अमोल कोल्हे यांच्याकडे पाहून येतोय. आम्ही सभा स्थळावरुन उठत नव्हतो, आम्हाला शिवसैनिकांनी उठवले अशी भूमिका एका कार्यकर्त्याने मांडली. दुसरीकडे अमोल कोल्हे त्यांची समजूत काढताना दिसत आहेत.
अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, काँग्रेसचे मतदारसंघ अध्यक्ष दिलीप तुपे, शिवसेनेचे मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र बाबर, माजी उपमहापौर नीलेश मगर, बंडू गायकवाड, सत्कार समारंभाचे संयोजक माजी नगरसेवक योगेश ससाणे आदी यावेळी उपस्थित होते.