Woman Killed After Hit By Speeding Car In Pune: पुण्यातील सासवड रोड सातवडी येथे एका भरधाव कारने महिला सफाई कामगाराला चिरडलं. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छाया शिंदे (वय, ४५) असे या महिलेचे नाव आहे. छाया या हडपसर येथील आकाशवाणी येथील रहिवाशी आहे. छाया महापालिकेच्या ठेकेदाराची कर्मचारी म्हणून काम करीत होत्या. सासवड रोड सातववाडी येथे प्रशांत सुरसे यांच्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या कडेला छाया शिंदे या रस्ता स्वच्छ करण्याचे काम करीत होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथला धडक देऊन छाया यांना चिडरलं.
छाया या कारच्या समोरच्या चाकाखाली आल्या. कारने त्यांना दहा ते पंधरा फूट फरफटत नेल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात छाया यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन छाया यांना बाहेर काढलं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर कारचालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.