Pune Accident News: पुण्यातील बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव कारने रस्त्यावर थांबलेल्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्व तरुण वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ पहाटेच्या सुमारास एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. त्यानंतर पहाटे पाच वाजताच्या सुमारास एका स्विफ्ट कारने (एमएच १२ केडब्ल्यू ३६६३) या बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अशरक्ष:चुराडा झाला. या कारमध्ये एकूण सहा जण होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी जखमींना उपचारासाठी आधी नवले रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात मरण पावलेल्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. तर, सोहम खळे (वय, १९), आयुष काटे (वय, २०), अथर्व झेडगे (वय, १९), प्रतीक बंडगर (वय, १९) आणि हर्ष वरे (वय, १९) असे जखमींची नावे आहेत. मयत आणि जखमी पुण्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. तसेच बस चालकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर करवाई करीत आहेत.
संबंधित बातम्या