पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. हिंजवडी - माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (२४ जानेवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास रेडिमीक्सने भरलेला डंपर रस्त्यातच पलटी झाला. त्याखाली चिरडून दुचाकीवर स्वार दोन इंजिनिअर तरुणी जागीच ठार झाल्या. पिंपरी-चिंचवडमधल्या हिंजवडी भागात मान रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणी दुचाकीने (एमएच/१२ एक्सएल ५७४४) चालल्या होत्या. त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटला आणि डंपर रस्त्यातच पलटी झाला. त्यामुळे डंपरखाली सापडून दोन तरुणी जागीच ठार झाल्या. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व अपघातग्रस्त डंपर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. मृत तरुणींची ओळख पटवण्याचं काम केलं जात आहेत.
समोर आलेल्या व्हिडिओत दिसतं की, तरुणी मोपेडवरून जात असताना समोरून भरधाव वेगाने डंपर येतो. अनियंत्रित डंपर तरुणींच्या अंगावर पटली झाल्याने दोन्ही तरुणी स्कुटीसह त्याखाली दबल्या जातात. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ माजली. दरम्यान डंपर चालकही जखमी असल्याचं सांगितले जात आहे.
दोन्ही तरुणी आयटी क्षेत्रातील अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
संबंधित बातम्या