Pune Porsche Car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन देणाऱ्या बाल न्यायिक बोर्डावर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही समिती अल्पवयीन आरोपीला अपघातावर निबंध लिहून थयाल जामिनावर सोडणाऱ्या बाल न्याईक बोर्डाच्या दोन सदस्यांच्या जुन्या रेकॉर्डची चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे. १९ मे रोजी कल्याणी नगर येथे झालेल्या अपघातात अभियंता असलेल्या एका तरुणीचा आणि तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, त्यानंतर बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दात निबंध लिहून वाहतूक विभागात काम करण्यास सांगून काही अटींवर काही तासांत जामीन मंजूर केला होता. यामुळे पुणे शहरात संतापाची लाट उसळली होती.
महाराष्ट्राचे महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नरनवरे यांनी ही समिती स्थापन केली आहे. एका वृत्त पत्राने या बाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारने बाल न्याय मंडळाच्या ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे. त्यांची आता चौकशी केली जाणार आहे. याशिवाय, मंडळामध्ये एक मुख्य दंडाधिकारी देखील असतो, ज्याची नियुक्ती न्यायपालिकेद्वारे केली जाते, त्याची देखील या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे.
प्रशांत नरनवरे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहीतीनुसार, आरोपीला अपघातावर ३०० शब्दांत निबंध लिहिण्यास सांगून त्याला जामीनावर सोडण्यात आले होते. या घटनेमुळे पुण्यात नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तसेच यावर 'सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. काहींनी यावर तयार केलेले मीम्स देखील व्हायरल झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बाल न्याय मंडळावर टीका झाल्यावर ज्यांनी हा निर्णय दिला त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन्ही सदस्यांच्या जुनी प्रकरणे आणि त्यांनी दिलेल्या आदेशांची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. या दोघांची नियुक्ती दीड वर्षांपूर्वी झाली असून, या अहवालाच्या आधारे राज्य सरकार त्यांची नियुक्ती रद्द करू शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हा अपघात झाल्यावर अल्पवयीन आरोपीला बाल मंडळ न्यायालयापुढे सादर करण्यात आले होते. या न्यायालयाने १५ तासांनंतर ल्पवयीन आरोपीला ७ हजार ५०० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. तसेच वाईट संगतीपासून दूर राहण्याची ग्वाही अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी कोर्टात दिली होती. त्यामुळे जामीन मंजूर झाल्याचे बोलले जात होते. तसेच आरोपीला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. जामिनाच्या अटींमध्ये १५ दिवस पोलिसांसोबत काम करणे, दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता.
मात्र, या जामिनाला तीव्र विरोध झाल्यानंतर बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला होता. तसेच, त्याला ५ जूनपर्यंत बाल न्याय मंडळाच्या देखरेख केंद्रात पाठवण्यात आले. याशिवाय आरोपीचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. सोमवारीच पोलिसांनी ससून सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला या प्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, फॉरेन्सिक प्रमुख अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून दुसऱ्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी दिले होते. यासाठी त्यांनी मोठी लाच घेतल्याचे देखील तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी ३ लाख रुपये देखील जप्त केले आहे.
संबंधित बातम्या