Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ उभ्या असलेल्या एका क्रेनला ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जखमी झाले आहेत.
आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात क्रेन (MH 06 AL 4135 ) व ट्रक ( MH 25 AJ 1005 ) दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चेंदामेंदा झालेल्या अपघातग्रस्त गाड्यांमध्ये दोन जण अडकले होते.
पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची चार वाहनं घटनास्थळी पोहोचली. गाडीच्या सांगाड्यात अडकलेल्या दोन्ही व्यक्तींना अग्निशमन दलाच्या जवानांनी स्प्रेडर कटर व कटावणीच्या मदतीनं बाहेर काढलं. हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बेंगळुरू-मुंबई बाह्य वळण हायवेवरील कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. हा मार्ग चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. नवले पूला शेजारी रस्त्याचं नव्यानं बांधकाम करावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आधीच केली आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी जीवघेणा ठरत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. दक्षिणेकडच्या अनेक राज्यातील अवजड वाहनं ही मुंबईच्या दिशेनं माल वाहतूक करत असतात. त्यामुळं २४ तास हा महामार्ग व्यस्त असतो. त्यातूनच अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.