Pune Crane Accident: पुण्यातील कर्वे रोड परिसरात क्रेनने चिरडल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रेन चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
देवळी (वय,६६) असे क्रेनखाली चिरडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवळी हे मजूर असून कोथरूड येथील रहिवासी आहेत. मयत आज सकाळी सायकलवरून कामावर जाताना कर्वे रोडवरील सोनल हॉलजवळ क्रेनने त्यांना चिरडले. या अपघातात देवळी यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली. याप्रकरणी क्रेन चालक सलीम अली याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली.
डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी कर्वे रोडवरील सोनल हॉलजवळ हा अपघात झाला. सकाळी दहाच्या सुमारास देवळी क्रेनच्या मागून जात होते. क्रेन चालक सलीम अली क्रेनच्या पाठीमागे देवळी असल्याचे दिसले नाही. त्यामुळे देवळी क्रेन खाली चिरडले गेले. या अपघातात देवळी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सलीम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली जाईल."
कर्वे रोडवर फूटपाथ आणि सायकल मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे रहदारीसाठी रस्ता अरुंद झाला असून सकाळ आणि संध्याकाळी या परिसरात वाहनांची वर्दळ जास्त असते. उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने गाड्या येत असताना रस्त्यावरून दुचाकी चालवणे कठीण होत आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथून निघालेली बस गुरुवारी जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात दरीत कोसळली. या अपघातात एकूण ५७ जण जखमी झाले. ज्यात ९ महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. जम्मू-पुंछ राष्ट्रीय महामार्गावरील अखनूरपासून १२ किमी अंतरावरील तुंगी मोड येथे दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींपैकी अनेकांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर, काहींना अखनूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.