Pune chandanngar crime : पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली. पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने भर पोलीस चौकीत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याचा आरोप या तरुणाने केले असून यातून नैराश्य आल्याचे सांगत त्याने हे पाऊल उचलले. या घटनेमुळे पोलिसांची मात्र, धावपळ उडाली.
नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेल रस्ता, वाघोली) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मुकेश पानपाटील (वय ३१) यांनी या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथचे त्याच्या पत्नीसोबत वाद झाले होते. ती माहेरी निघून आली होती. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याने नवनाथ चिडला होता. रागाच्या भारत नवनाथ सासूरवाडीत गेला. मात्र, ती घरी नव्हती. यावेळी त्याने पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधत ती कोठे आहे अशी विचारणा केली. तेव्हा तिने चंदननगर पोलीस ठाण्याच्या महात्मा फुले पोलीस चौकीत असल्याचे सांगितले.
नवनाथने थेट महात्मा फुले चौकी गाठली. यावेळी त्याने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरले. पोलीस चौकीत गेल्यानंतर त्याने सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार केली. तसेच त्यांच्या सांगण्यावरून पत्नी नांदायला येत नसल्याने रागाच्या भरात नवनाथने बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतले तसेच कडीपेटीने स्वताला पेटवण्याचा प्रयत्न केला. ही बाब चैाकीतील पोलिसांना लक्षात येताच तयांनी प्रसंगावधान राखून त्याला रोखले. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत. या पूर्वी देखील पोलिस ठाण्यात आत्महत्या करण्याच्या दोन घटना पुण्यात उघडकीस आल्या आहेत. या घटना लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. पोलिस त्रास देत असल्याच्या कारणावरून एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या