Puja Khedkar : सगळंच फेक! पूजा खेडकरांनी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी दिले बनावट रेशन कार्ड, घरचा पत्ताही निघाला खोटा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Puja Khedkar : सगळंच फेक! पूजा खेडकरांनी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी दिले बनावट रेशन कार्ड, घरचा पत्ताही निघाला खोटा

Puja Khedkar : सगळंच फेक! पूजा खेडकरांनी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी दिले बनावट रेशन कार्ड, घरचा पत्ताही निघाला खोटा

Jul 17, 2024 05:34 PM IST

Puja Khedkar :आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेल्या आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी बनावट रेशनकार्डचा वापर केल्याचे समोर आले आहे.

पूजा खेडकर
पूजा खेडकर

भारतीय नागरी सेवेतील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. दृष्टीदोष व मानसिक आजारी असल्याचे बनावट अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून त्यांनी सरकारी नोकरी बळकावल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यूपीएससी आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचा दाखला मिळवण्यासाठी खोटा पत्ता आणि बनावट रेशनकार्डचा वापर केला.

पूजा खेडकर यांनी प्लॉट क्रमांक ५३, देहू-आळंदी, तळवडे हा पत्ता यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलला (वायसीएम) सादर केला. मात्र, ज्या जागेवर तिने आपले घर असल्याचा दावा केला, तो भाग थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या बंद पडलेल्या कंपनीची जागा आहे.

बनावट शिधापत्रिका तयार करण्यासाठी खोट्या पत्त्याचा वापर करण्यात आल्याचे दर्शविणारी कागदपत्रे मिळाल्याचा दावा इंडिया टुडेने केला आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून पुण्यातील वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले. २४ ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात पूजा खेडकर यांना गुडघ्यात सात टक्के अपंगत्व असल्याचे नमूद करण्यात आले होते.

खोट्या पत्त्यावरच ऑडी कारची नोंदणी -

खेडकर यांचा बनावट पत्ता असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग या कंपनीअंतर्गत ऑडी कारची ही नोंदणी करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून २ लाख ७० हजार रुपयांची थकबाकी आहे.

या आरोपांशिवाय पूजा खेडकर यांच्यावर सत्तेचा गैरवापर आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) संचालक असताना पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा सविस्तर अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारला सादर केला.

पूजा खेडकर चे प्रशिक्षण थांबविण्यात आले असून तिच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी तिला लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत बोलावण्यात आले आहे.

खेडकर यांनी आपण निर्दोष असून आपल्यावरील दावे फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याने वाशिम येथे बदली चे आदेश देणाऱ्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर