Pune crime : पुण्यात व परिसरात गेल्या दिवसांपासून हनीट्रॅपमध्ये अडकवून वृद्ध नागरिकांना लुटण्याचा प्रकार सुरू होता. या प्रकरणी एका पिडीत वृद्धाने फिर्याद दिल्यावर या प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हनीट्रॅप करणाऱ्या या टोळीचा पीएसआय म्होरक्या असल्याचं निष्पन्न झालं आहे. पुणे शर पोलिस दलात हा पीएसआय कार्यकरत असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी टोळीतील महिलांना अटक केली असून याची माहिती मिळाल्यावर हा पीएसआय फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय काशिनाथ मारुती उभे (वय ५५) असे आरोपी पीएसआयचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएसआयच्या टोळीत काही तरुणी व महिला होत्या. या महिला पीएसआयच्या सांगण्यावरून ज्येष्ठ नागरिकांशी ओळख वाढवून त्यांना त्यांच्या जाळ्यात ओढायचे, व त्यांना लॉजवर नेले जायचे. या ठिकाणी थोड्याच वेळात पीएसआय हा धाडी टाकून पोलिस असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात होते.
या प्रकरणी एका जेष्ठ नागरिकांने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार या टोळीतील तीन महिलांना १ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. अटक करण्यात आलेल्या एका महिलेवर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात डॉक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा देखील दाखल असल्याचं तपासात पुढं आलं आहे. या टोळीने अनेकांना अशाप्रकारे लुटल्याचा संशय आहे. यातील काहींनी बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नसल्याचं पुढं आलं आहे.
मात्र, एका वृद्ध नगरिकाने विश्रामबाग पोलिसांनी तीन महिला व एका व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी तापासाची सूत्र फिरवली आणि धक्कादायक माहिती पुढे आली. यात पीसएसआय काशीनाथ उभे हा या टोळीच्या म्होरक्या असल्याचं निष्पन्न झालं.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिक हे नुकतेच एका कंपनीतून निवृत्त झाले असून टोळीतील एका महिलेने त्यांच्याशी ओळख वाढवली. दरम्यान, आजारी असल्याचं सांगत महिलेने वृद्ध व्यक्ति कडून दोन वेळा पैसे घेतले. हे पैसे परत देण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीला सोमवारी दुपारी अलका टॉकीज चौकातील एका लॉजवर बोलावले. थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर रूममध्ये दोन महिला व एक पुरुष अचानक घुसले. त्यांनी वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यास सुरवात केली. यावर त्यांनी वृद्ध व्यक्तीला ते महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या, तर पुरुषाने पोलिस असल्याचे संगितले. त्याच्यावर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली.
यावेळी सोबत असलेल्या महिलेनेदेखील वृद्धव्यक्तीवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला. यानंतर सर्वांनी प्रकरण मिटवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडे ५ लाखांची मागणी केली. मात्र, वृद्ध व्यक्तिने पैसे नसल्याचं कारण दिल्याने ३ लाख तडजोडीत द्यायचे ठरले. आरोपींनी वृद्धाच्या खिशातील २० लुटले. यानंतर एटीएममधून ६० हजार काढण्यासाठी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मात्र, त्याने पिन चुकीचा टाकला. त्याची अंगठी देखील त्यांनी सराफा दुकानात विकायचा प्रयत्न केला. मात्र, सोन्याच्या बदल्यात सोने घ्यावे लागेल असे दुकानदाराने म्हटल्याने वृद्धकडून पैसे उकळण्याचा हाही प्रयत्न फसला. यामुळे त्यांनी त्याला मारहाण करत घरातून चेक आणून पैसे आणून दे म्हणून दम दिला. हीच संधी साधून वृद्ध व्यक्तीने पळ काढला.