Belgaum Marathi Maha Melava : कर्नाटकमधील बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते कार्यकर्ते या मेळाव्यासाठी जात होते. मात्र, त्यांना कोल्हापुर पोलिसांनी वाटतेतच अडवलं आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार हे मिलिजुली सरकार असल्याचा आरोप या वेळी कार्यकर्त्यांनी केला. तसेच गनिमीकावा करत आम्ही बेळगावला जाणारच असा निर्धार देखील यावेळी आंदोलकांनी केला आहे.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून बेळगाव येथे सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले होते तसेच या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित केले होते. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समर्थनासाठी या मेळाव्याला यावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने या महामेळाव्यावर बंदी घातली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकात येण्यास बंदी केली आहे.
या मेळाव्यासाठी आज सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते व नेते बेळगाव येथील या मेळाव्यासाठी निघाले होते. हे कार्यकर्ते बेळगाव सीमेवर पोहोचले असता, यावेळी कोल्हापुर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी त्यांना कर्नाटकमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कागल येथे आणून सोडलं. यावेळी आंदोलकांनी मोठी घोषणा बाजी केली. महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांचे विरोधक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य पोलिसांनी आम्हाला का अडवलं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार हे मिलेजुले सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
बेळगावमध्ये होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी जाण्यावर ठाम असल्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. यासाठी गनिमी कावा करू असे देखील आंदोलक म्हणाले. दरम्यान, बेळगाव येथे देखील या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या