मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीच्या वडिलांचे दुकान आणि ट्रक जाळला; आरोपीला अटक

Nagpur: लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीच्या वडिलांचे दुकान आणि ट्रक जाळला; आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 23, 2022 02:09 PM IST

Nagpur Crime News Marathi : गेल्या सात महिन्यांपासून आरोपी तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानं प्रेयसीकडे पळून जाण्याचा तगादा लावला होता.

Waghoda Nagpur Crime News Marathi
Waghoda Nagpur Crime News Marathi (HT_PRINT)

Waghoda Nagpur Crime News Marathi : लग्नाला नकार देत घरातून पळून येण्यासाठी तयार नसलेल्या एका तरुणीच्या प्रियकरानं दुकान आणि वाहन पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील वाघोडा या गावात ही घटना घडली असून आरोपी आणि तरुणीमध्ये गेल्या सात महिन्यांपासून संबंध होते. परंतु नात्यात वाद झाल्यानंतर आरोपीनं प्रेयसीच्या वडिलांची संपत्ती जाळून टाकल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील वाघोडा गावात एका विवाहित पुरुषाचं गावातीलच एका तरुणीशी प्रेमप्रकरण जुळलं होतं. याची माहिती आरोपीच्या पत्नीला मिळताच तिनं पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं संतापलेल्या आरोपीनं प्रेयसीला लग्नासाठी घरातून पळून जाण्यासाठीची गळ घातली. परंतु पळून जाण्यास प्रेयसीनं नकार दिल्यानं संतापलेल्या आरोपीनं तिच्या वडिलांची मालकी असलेलं एक दुकान आणि भाजीपाल्यांनी भरलेलं मिनी ट्रक जाळून टाकलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणीमध्ये विवाहबाह्य संबंध होते. आरोपीला त्याची पत्नी सोडून गेल्यामुळं प्रेयसीशी लग्न करायचं होतं. परंतु त्यासाठी तरुणीनं नकार दिल्यानं त्यानं संपत्ती जाळली आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग