Sangli Crime News : सांगली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून नातवांनी मिळून आईच्या साह्याने आजीचा टॉवेलच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सांगलीच्या खानापूर तालुक्यातील पारे येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
सखुबाई संभाजी निकम (वय ८०) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. तर आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम आणि आणखी एका अल्पवयीन नातवाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचणी येथील सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. या सोबतकह त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी संपत्ती देखील आहे. दरम्यान, त्यांच्या संपत्तीतील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून रेणुका यांना होता. याच रागातून त्यांनी आजीचा खून करण्याचे ठरवले.
तिघेही सोमवारी (दि १९) संगिता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी गेले. यावेळी टयांनी तू तूझ्या भावाला बोलावून घेऊन ४८ तासाच्या आत संपत्तीची मालकी फिरवून दे; नाही तर तुला व म्हातारीला (सखुबाई) यांना जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान, मंगळवारी (दि २०) आरोपी हे १२ च्या सुमारास सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून त्यांनी खून केला. खून केल्यावर तिघेही त्यांच्या विटा येथील घरी परत आले.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. उपअधिक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी याची गंभीर दखल घेत पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सखूबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रूग्णालयात पाठवला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सखुबाई यांच्या अल्पवयीन नातवासह नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना अटक केली.