विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी आझाद मैदान येथे शपथ घेतल्यानंतर आज नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या शपथविधी कार्यक्रम होणार आहे. आजपासून तीन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन मुंबईत होत आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आमदारांना शपथ देणार आहे. आमदारकीची शपथ घेण्यासाठी विविध पक्षांचे आमदार रंगीबेरंगी फेटे घालून विधानभवनात दाखल झाले आहेत.
आमदारांच्या शपथ कार्यक्रमात सर्वात पहिली शपथ बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार चैमसुख संचेती शपथ घेणार आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडाचे भाजप आमदार जयकुमार रावळ हे शपथ घेतील. तर तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे शपथ घेणार आहे. चौथ्या क्रमांकावर रामटेकचे शिवसेना- शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल शपथ घेतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आज आमदारकीची शपथ घेणार आहे. फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा क्रमांक ५,६ आणि ७ असा आहे. त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष म्हणून काम केलेले दिलीप वळसे पाटील (आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार), नाना पटोले (आमदार, कॉंग्रेस), राहुल नार्वेकर (आमदार, भाजप), विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार) हे आमदारकीची शपथ घेणार आहे. आज शनिवारी ७७ आमदारांचा शपथविधी होणार आहे.
शपथ घेत असताना नवनिर्विचीत आमदारांनी स्वतःचे नाव, आईचे व वडिलांचे नाव आणि आडनाव अशा क्रमाने नाव घेत शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुकारण्यात आल्यानंतर सभागृहात उपस्थित शिवसेनेच्या आमदारांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. तर अजित पवार यांच्या शपथेपूर्वी ‘एकच दादा, अजित दादा’ अशा घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी गुलाबी रंगाची पगडी डोक्यावर घातली होती. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. हसन मुश्रीफ यांना अल्ला साक्ष शपथ घेतली.
दरम्यान, विरोधी पक्षाचे आमदार आज, शनिवारी, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेणार नसल्याचे कळते. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांचे नवव्या क्रमांकावर नाव पुकारल्यानंतर ते शपथेसाठी हजर नव्हते. ठाकरे गटाचे कोकणातील गुहागरचे आमदार भास्कर जाधव, कॉंग्रेस पक्षाचे नागपूर (उत्तर)चे आमदार नितीन राऊत अनुपस्थित होते.