Wayanad By Election Result: वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wayanad By Election Result: वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

Wayanad By Election Result: वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी!

Nov 23, 2024 05:38 PM IST

Wayanad By Election Result 2024: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वायनाड पोटनिवडणुकीत ४ लाखांहून अधिक मतांनी जिंकून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी!
वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी! (AICC)

Priyanka Gandhi News: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी सहज विजय मिळवला. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या अनेक तासांनंतर काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या (यूडीएफ) उमेदवार प्रियांका गांधी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राहुल गांधी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त होता.

विजयानंतर प्रियांका गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘वायनाडच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. काळाच्या ओघात हा विजय तुमचा विजय आहे, याची तुम्हाला जाणीव होईल आणि तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडलेली व्यक्ती तुमच्या आशा-स्वप्ने समजून घेईल आणि तुमच्यासाठी लढेल, याची मी खात्री करून देते. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे.’

पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'मला हा सन्मान दिल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा तुम्ही मला दिलेल्या अपार प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. यूडीएफमधील माझे सहकारी, संपूर्ण केरळमधील नेते, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि माझ्या कार्यालयातील सहकारी ज्यांनी या मोहिमेत प्रचंड मेहनत घेतली, आपल्या पाठिंब्यासाठी, दिवसाला १२ तासांचा (अन्न नाही, विश्रांती नाही) गाडीचा प्रवास सहन केला आणि त्या आदर्शांसाठी खऱ्या सैनिकांप्रमाणे लढा दिला, आपण सर्वजण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांचे खूप खूप आभार. तुम्ही मला जे प्रेम आणि धैर्य दिले आहे त्याबद्दल कोणतीही कृतज्ञता कधीही पुरेशी ठरणार नाही. आणि माझा भाऊ राहुल, तू त्या सर्वांमध्ये सर्वात धाडसी आहेस. मला मार्ग दाखवल्याबद्दल आणि मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद!

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, प्रियांका गांधी यांना ६ लाखांपेक्षा अधिक मत मिळवून चार लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाडमधून निवडणूक लढवणारे राहुल यांना ६ लाख ४७ हजार ४४५ मते मिळाली आणि त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) अॅनी राजा यांच्यावर ३ लाख ६४ हजार ४२२ मतांनी विजय मिळवला. २०१९ मध्ये राहुल यांना ७ लाख ०६ हजार ३६७ मते मिळाली होती आणि त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ४ लाख ३१ हजार ७७० मतांनी विजय मिळवला होता.

वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक झाली. प्रियंका गांधी यांच्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नव्या हरिदास यांच्यात लढत होती. प्रियंका गांंधी यांचे बंधू राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर वायनाडची जागा रिक्त झाली होती. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाडसह उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडची जागा रिकामी केली.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर