पुण्यात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून ४ जुलैपर्यंत शहरात झिका विषाणूचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यात दोन गरोदर महिलांचा समावेश आहे. मोठ्या संख्येने नागरिक आणि गरोदर माता खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने पुणे महापालिकेने झिका विषाणूच्या धोक्याचा सामना करण्यासाठी खासगी रुग्णालयाशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी शनिवारी आरोग्य विभागासोबत बैठक बोलावली आहे. झिका विषाणूची चाचणी आणि देखरेख वाढविण्यासाठी सर्व खाजगी रुग्णालये, खाजगी डॉक्टर, प्रॅक्टीस प्रसूतितज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची बैठक घेण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळवंत यांनी सांगितले की, अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सोमवारी सर्व मोठी खासगी रुग्णालये, जनरल प्रॅक्टिशनर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय) यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार आहे.
सर्व मोठ्या रुग्णालयांना त्यांच्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांना त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या गरोदर महिलांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यास सांगितले जाईल. संशयित गरोदर महिलांचे नमुने झिका विषाणूच्या संसर्गाच्या तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठवले जाणार आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संशयित रुग्णांचे १६ नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या १६ नमुन्यांपैकी ९ नमुने मुंढवा परिसरातील तर ३ नमुने कोथरूड परिसरातील गरोदर महिलांचे आहेत. बुधवारी एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या १३ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
तापाच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि संशयित रुग्णांची कोरोना संसर्गाची तपासणी करावी. तसेच आम्हाला झिका पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राधान्याने द्यावा, अशी विनंती केली जाईल, असे डॉ. बळवंत यांनी सांगितले.
खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार झिका विषाणूसंसर्गाची लागण झालेल्या तीन रुग्णांचे अहवाल मनपाला प्राप्त झाले आहेत. या तीन रुग्णांपैकी कोथरूड येथील ६८ वर्षीय पुरुष आणि सासवड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. प्रभात रोड येथील ६२ वर्षीय महिलेचा १ जुलै रोजी खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
सध्या गरोदर महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याची माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली. खासगी प्रयोगशाळांमधून आलेले झिका पॉझिटिव्ह रुग्ण संशयित रुग्ण मानले जातात. हे रुग्ण संशयित रुग्ण मानले जात असले तरी या भागात प्रतिबंधात्मक कारवाई आणि पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सासवड येथील ६५ वर्षीय रुग्ण मनपा हद्दीबाहेर असल्याने त्याचा तपशील जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डासांचा दंश, लैंगिक संपर्क, गरोदरपणात आईकडून गर्भ, रक्त संक्रमण आणि अवयवदानातून झिका विषाणूचा प्रसार होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान झिका विषाणूच्या संसर्गामुळे अर्भकामध्ये मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृती उद्भवू शकतात, ज्यात अवयव आकुंचन, उच्च स्नायूंचा टोन, डोळ्यांची विकृती आणि श्रवणशक्ती कमी होणे यांचा समावेश आहे. या क्लिनिकल वैशिष्ट्यांना एकत्रितपणे जन्मजात झिका सिंड्रोम म्हणून संबोधले जाते. यामुळे गर्भात गुइलेन-बॅरे सिंड्रोम देखील होऊ शकतो.
जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नागनाथ येंपळे यांनी सांगितले की, पुणे शहरात झिका विषाणूचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
औंध जिल्हा रुग्णालय, २४ ग्रामीण रुग्णालये, ५ उपजिल्हा रुग्णालये आणि एक महिला रुग्णालयातील अधिकाऱ्यांना तापाचे रुग्ण व गरोदर महिलांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संशयित रुग्णांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात झिका रुग्णांसाठी दहा खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या