Private Finance Loan Fraud : मुंबईच्या (Mumbai) बोरिवलीतील (Borivali) एका महिला व्यावसायिकाला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून तिची २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात दोन फ्रॉड लोन एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बोरिवलीतील गोराई येथे पतीसोबत राहते आणि पतीसोबत स्टेशनरीचा व्यवसाय करते. या महिलेने व्यवसायासाठी आणि फ्लॅट खरेदी करण्यासाठी अनेक बँकांकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी, तसेच व्यवसायवृद्धीसाठी तिला ७० लाख रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्यासाठी तिने बँकांमध्ये अर्ज केला होता. मात्र, सध्याच्या कर्जामुळे त्यांना बँकांकडून नवीन कर्ज मिळू शकले नाही. येथेच कर्ज घोटाळेबाजांनी महिलेची फसवणूक करण्याची संधी पाहिली. आरोपी चंद्रकांत गायकवाड आणि प्रदीप मिश्रा यांनी महिलेला खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच कर्जासाठी महिलेचे कागदपत्रे घेऊन कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले.
कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना ८ टक्के कमिशन देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर चंद्रकांत आणि त्याचा सहकारी प्रदीप मिश्रा यांनी प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स सह विविध कारणांवरून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी कर्ज मंजुरीचा चेक व्हॉट्सअॅपवर पाठवला. दोघांवर विश्वास ठेवून महिलेने त्यांना २८ लाख रुपये दिले. परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा झाली नाही. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे या व्यावसायिकमहिलेच्या लक्षात येताच तिने मालाड पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत गायकवाड आणि प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात बोगस मंजुरी पत्र पाठवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मालाड पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे."
संबंधित बातम्या