Pune Burning Bus : पुण्यात आज सकाळी भीषण दुर्घटना घडली. एका खासगी बसला अचानक आग लागली. ही बस आगीत संपूर्ण जळाली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजता हडपसर येथील सोलापूर मार्गावरील कदम बाग वस्तीलगत घडली. या बसमधून तब्बल १४ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या लक्षात ही घटना आल्याने थोडक्यात बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले.
या घटनेचे वृत्त असे की, आज सकाळी एक खासगी ट्रॅव्हलबस काही प्रवाशांना घेऊन पुणे सोलापूर मार्गाने जात होती. ही बस हडपसर येथे आली असता बसमधून अचानक मोठा धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखात तातडीने बस रस्त्यावरच थांबवली. व तातडीने प्रवाशांना गाडीतून उतरण्यास सांगितले. या बसमध्ये तब्बल १४ प्रवासी आणि चालक व त्याचा सहकारी प्रवास करत होते. प्रवाशांना खाली उतरवल्यावर बसने अचानक पेट घेतला व पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेची माहिती पुणे महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाकडून हडपसर व पीएमआरडीए येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांना एक खाजगी बसने पेट घेतल्याचे दिसले. त्याचवेळी जवानांनी प्रथम बसमध्ये कोणी आहे का याची खात्री करत आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे वीस मिनिटे बसवर पाण्याचा मारा केल्यावर आग आटोक्यात आली. या घटनेत जखमी कोणी नसून या बसमधील १४ प्रवासी व वाहनचालक सुरक्षित आहेत. बस पुर्ण जळाल्याने प्रवाशांचे सामान व डिक्कीमधील एक दुचाकी देखील जळाली आहे.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच वाहनचालक नारायण जगताप व जवान बाबा चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड व पीएमआरडीएचे वाहनचालक संदिप शेळके व जवान लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सुरज इंगवले, संकेत कुंभार यांनी सहभाग घेतला.