PM Narendra Modi visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मंगळवारी स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या आगमनानिमित्त पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आल्याने मध्य भागात वाहतूक कोंडी झाली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या आगमनानिमित्त शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या रस्त्यांना जोडणारे उपरस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणारे नागरिक कोंडीत अडकले. यामुले पुणेकरांना मोठा मनस्ताप झाला. जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता, आपटे रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली, तसेच टिळक रस्ता, सदाशिव पेठ, शास्त्री रस्ता परिसरात कोंडी झाली. पोलिसांनी रंगीत तालिमीसाठी पंधरा ते वीस मिनिटे रस्ते बंद केले होते.
पुण्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहे. पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांची सभा होणार आहे. या सभेत मोदी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला करणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पुण्यात एस. पी महाविद्यालय परिसराला छावणीचे रूप आले असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून सोमवारी करण्यात आली आहे.
कार्यक्रम स्थळ, लगतचा परिसर, तसेच सभेच्या ठिकाणची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी वाहतूक विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना सतर्कचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास राहणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी शहरात आगमन होणार आहे. सोमवारी पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. पंतप्रधानाचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या भागातील रस्त्यांवर पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेतली. जंगली महाराज रस्ता, विमानतळ रस्ता, टिळक रस्ता परिसरात सोमवारी सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लायडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.