पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज यवतमाळ येथे मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ, रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज यवतमाळ येथे मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ, रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज यवतमाळ येथे मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ, रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

Feb 28, 2024 08:11 AM IST

Modi Awas Gharkul Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून १० लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.

Modi Awas Gharkul Yojana
Modi Awas Gharkul Yojana

मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या १० लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

येत्या दोन आर्थिक वर्षात एकूण १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन २०२३-२४ मध्ये मंजूर ३ लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी २लाख ५० हजार लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या ३७५  कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून १७,००,७२८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून  ७,०३,४९७ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “महा आवास अभियान  २०२३-२४ अंतर्गत ७ लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.

नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग, रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील ६४५  कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या ३९ कि.मी लांबीचा रेल्वे मार्ग  व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील ६४५  कोटी रूपये खर्च आलेल्या न्यु आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या ३२.८४कि.मी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

रस्ते प्रकल्पांमध्ये २९१ कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत  ५५.८०  कि.मी दुपदरी रस्ता काम, ३७८ कोटी रूपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदिया) महामार्गावरील ४२ कि.मी लांबीच्या क्राँक्रीटीकरण रस्ता काम, तसेच  ४८३ कोटी रूपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील  १८  कि.मी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर