Maharashtra Teachers on strike: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आज (बुधवार, २५ सप्टेंबर) संप पुकारला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, तेथील विद्यार्थी, शिक्षण आणि शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्याची सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी याबाबत माहिती दिली. या संपामध्ये अनेक संघटना सहभागी झाल्याची माहिती आहे.
‘आम्हाला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या’, अशी घोषणा करत राज्यातील ५९ हजार शिक्षकांनी आज संप पुकारला आहे. अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करणे, संचमान्यता, कमी पटसंख्येच्या शाळातील कंत्राटी शिक्षक नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी शिक्षकांची आहे. शिक्षकांच्या संपाला महाराष्ट्र शिक्षण संस्था संघटना, माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शैक्षणिक व्यासपीठ, अनेक सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे.
राज्य शासनाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय काढून शाळांतील शिक्षकांची पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन पैकी एक पद रिक्त करून त्याठिकाणी कंत्राटी स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करण्याचा आदेश काढण्यात आला. मात्र, काही दिवसानंतर या आदेशात बदल करण्यात आला आणि १० पेक्षा कमी पटसंख्येच्या बाबतीत कंत्राटी बेरोजगार नियुक्ती कायम ठेवण्याची दुरुस्ती करणारा आदेश काढला. मात्र, दोन्ही आदेश विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध असल्याने ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली. याचबरोबर सतत चालणाऱ्या मतदार नोंदणीचे कामाचा अशैक्षणिक काम म्हणून उल्लेख व्हावा आणि शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावीत, अशीही शिक्षकांची मागणी आहे.
याशिवाय, शाळा सुरु होऊन तीन महिने उलटले. मात्र, अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. ज्यात शाळेत मुलांना गणेश मिळाले, ते मापाचे नाहीत. याशिवाय, गणवेशाचे कापड अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. राज्यातील बऱ्याच शाळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. कुठे बसायला बँच नाहीत, अशीही तक्रार शिक्षकांकडून करण्यात आली आहे.