Pune Gramin SP Pankaj Deshmukh : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गुंडांची कुंडली तयार करून प्राधान्याने कारवाई केली जाणार, या सोबतच औद्योगिक वासहतीतील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी थेट कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देखील हॉटस्पॉट ठरवून उपाय योजना करण्यात येतील, अशी माहिती पुणे ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज प्रसार मध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, सायबर सुरक्षा आदीबाबत माहिती दिली.
देशमुख म्हणाले, लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या साठी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यव्यवस्था राखण्यासाठी आव्हाने मोठी आहे. त्यामुळे या साठी प्राधान्याने कारवाई केली जाईल. या साठी गुंडांची थेट कुंडली तयार केली जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. अनेकांकडे अवैध शस्त्र असून त्या दृष्टीने देखील कारवाई केली जाईल. ग्रामीण भागात अनेक औद्योगीक वसाहती असून त्या ठिकाणी खंडणीखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने देखील प्राध्यान्याने कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व्यापक प्रयत्न करणार आहे. वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरवून त्याची कारणे शोधली जाईल. तसेच पायाभूत सुविधांचा विकास करून त्या दृष्टीने वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल या साठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सोशल मिडियाचा गैरवापर करून सामाजिक शांततेला भंग करण्याचे प्रयत्न होतांना दिसत आहे. या सोबतच सायबर गुन्हेगारी देखील वाढली आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सायबर सेल अॅक्टिव्ह करणे, सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या दृष्टीने काही सॉफ्टवेअर किंवा काही अॅप्लिकेशन असतील ते घेतले जातील या सोबतच २४ तास कार्यान्वित असणारे कंट्रोल रूम स्थापन करण्यात येईल या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. येणाऱ्या काळात ग्रामीण पोलिसांना ५०० नवे पोलिस मिळणार आहे. यामुळे ग्रामीण पोलिस दलाची ताकद वाढणार आहे. या मनुष्यबळाच्या आधारे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.