Shivaji Maharaj statue :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे व नारायण राणे एकाच वेळी राजकोट किल्ल्या परिसरात आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यानंतर राणे यांनी प्रश्न विचारणाऱ्या एका वृत्त वाहिनीच्या पत्रकारासोबत गैरवर्तन करत त्याचा माईक (बूम) हुसकावून घेण्याचा प्रयत्न केला गेला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई प्रेस क्लबने (Press Club) वृत्तवाहिनीचे पत्रकार अमोल मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजप खासदार नारायण राणे यांचा निषेध केला आहे. प्रेस क्लबने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवार, २८ऑगस्ट रोजी मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट देताना एबीपीचे पत्रकार अमोल मोरे यांना धमकी दिल्याबद्दल मुंबई प्रेस क्लब भाजप नारायण राणे यांचा तीव्र निषेध करते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राणे यांनी रागाच्या भरात पत्रकाराचा बूम (माईक) हिसकावून घेतला आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी राणे आज सिंधुदुर्गात आले होते. नारायण राणे यांचे वर्तन पूर्णपणे अयोग्य आणि सत्तेचा दुरुपयोग करणारे आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसयांना विनंती करतो की, पत्रकाराला दिलेल्या धमक्यांमुळे राणे यांच्यावर कारवाई करावी. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्यांचे काम करण्यापासून कोणीही धमकावू शकत नाही, असेही प्रेस क्लबने म्हटले आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडियाशी बोलताना पत्रकारने प्रश्न विचारताच राणे अचानक भडकतात व रिपोर्टरचा माइक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात.
आज राणे पिता-पुत्र आणि आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पोहोचले तेव्हा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात नारेबाजी केली. आदित्य ठाकरे येताच राणे समर्थक "पेग्वीन -पेग्वीन" चे नारे देऊ लागले. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले व ते कोंबडी चोर म्हणून ओरडू लागले. यानंतर दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली व घटनास्थळी तुफान राडा झाला. परिस्थिती अनियंत्रित होताना पाहून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवाली लागली. आदित्य ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांची नारेबाजी करत किल्ला परिसरातून बाहेर पडले. मात्र तरीही राणे समर्थक घोषणाबाजी करत राहिले.