Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांसाठी राहणार उपस्थित-president draupadi murmur tour in maharashtra from 2 september visit start from kolhapur ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांसाठी राहणार उपस्थित

Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांसाठी राहणार उपस्थित

Sep 02, 2024 12:00 AM IST

president Draupadimurmur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर असून अनेक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वारणानगर, कोल्हापूर येथे श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

बुधवार ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत.

असा असेल राष्ट्रपतींचा कोल्हापूर दौरा -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  उद्या (सोमवार) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अंबाबाई दर्शन, शासकीय विश्रामगृह, वारणानगर येथील नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी रविवारपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण दौरा काळात दोन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंबाबाईच्या मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.

श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ निमित्ताने वारणा नगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू या उद्या सकाळी ११ वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेणार असून त्या काही वेळ सर्किट हाऊस येथे थांबून पुढे कार्यक्रमासाठी वारणा कोडोली कडे प्रस्थान करणार आहेत. या दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण मार्गावर व कार्यक्रमस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

या संपूर्ण दौऱ्या दरम्यान विमानतळ परिसर, अंबाबाई मंदिर, शासकीय विश्रामगृह, रस्त्याच्या दुतर्फा नेमलेले पॉईंट यासह वारणानगर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ३ अपर पोलीस अधीक्षक,  उपअधीक्षक -१२, पोलिस निरीक्षक -३६, उपनिरीक्षक -१३२, पोलिस अंमलदार -११०१ , महिला पोलिस -२०८, वाहतुकीसाठी पोलिस- २७३, जलद कृती दल -१० असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.