Udayan Raje Bhosale : कोश्यारींना निरोप नक्की?; उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपतींकडून दखल
Udayanraje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
Udayanraje Bhosale vs BS Koshyari : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज रायगडावर शिवभक्तांशी संवाद साधला असून त्यात कोश्यारींची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यातच आता त्यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्राची दखल राष्ट्रपतींनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं. आजच माझ्या पत्राला उत्तर आलं असून त्यात माझ्या पत्राची दखल घेण्यात आल्याचं मला समजलं. राष्ट्रपतींनी ते पत्र गृहमंत्रालयाला पाठवलं असून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली आहे. त्यामुळं आता भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावरून लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.
उदयनराजेंनी पत्रात काय लिहिलं होतं?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यामुळं माझ्यासह महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला वेदना झाल्याचं म्हटलं होतं. भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं समाजात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असून या विधानाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उदयनराजेंनी पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली होती.
शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढल्या...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रसाद लोढा आणि आमदार संजय गायकवाड या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनं शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका केली आहे. त्यातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी थेट भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात उमर खालिद आणि खालिद सैफी निर्दोष; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल