'गुलेन बॅरी सिंड्रोम'ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'गुलेन बॅरी सिंड्रोम'ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार

'गुलेन बॅरी सिंड्रोम'ला कारणीभूत जीवाणू आढळला! पुण्यात तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार

Jan 24, 2025 12:54 PM IST

Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचे रुग्ण वाढले आहे. यातील काही रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढले! तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार, नमुन्यात आढळला जेजुनी जिवाणू
पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढले! तब्बल १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २४ जणांवर आयसीयूत उपचार, नमुन्यात आढळला जेजुनी जिवाणू

Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. न्यूरोलॉजिकल आजाराचा प्रकार असलेल्या या आजाराचे तब्बल ६७ रुग्ण पुण्यात आढळले आहे. यातील १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २४ जणांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून पुण्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच बाधित रुग्णांचा देखील शोध घेतला जात आहे. दरम्यान, हा आजार होण्यास कारणीभूत ठरणारा जीवाणू तपासणीत आढळला आहे. 

पुण्यात ग्रामीण भागात गुलेन बॅरी सिंड्रोमचे ३९ रुग्ण आढळले आहे. तर पुणे महापालिकेच्या हद्दीत १३, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १२ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे पुण्यातील जीबीएसची रुग्णसंख्या ६४ वर पोहोचली आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने स्थापन केले शीघ्र प्रतिसाद दल

पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तर रुग्णांचे शौचनमुने व रक्तनमुने हे राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत. तर पुण्यातील विविध भागांतील पाण्याचा नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

रूग्णांच्या नमुन्यांमध्ये आढळला  कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी जीवाणू 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (आयसीएमआर-एनआयव्ही) च्या तज्ञांनी गुरुवारी शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या संशयित गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रूग्णांच्या नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी असल्याचे स्पष्ट केले. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा एक सामान्य बॅक्टेरियाचा संसर्ग आहे, जो जीबीएस या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरला कारणीभूत ठरू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात जानेवारीपासून संशयित जीबीएस रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यात एकूण ६७ रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेने मंगळवारी २३ संशयित रुग्णांचे रक्त, लघवी आणि मलनमुने तपासणीसाठी आयसीएमआर-एनआयव्हीकडे पाठवले असून गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात तीन जणांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

एनआयव्हीच्या अधिकाऱ्यांनी पालिकेला दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, तीन नमुन्यांचे तपासली अहवाल लवकरच जाहीर केले जातील. चिकनगुनिया, डेंग्यू आणि झिका विषाणूसाठी २३ रुग्णांच्या रक्ताचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. नऊ नमुन्यांचे नमुने नोरोव्हायरससाठी पॉझिटिव्ह आढळले. नोरोव्हायरसमुळे उलट्या आणि जुलाबासह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो आणि अत्यंत क्वचित प्रसंगी जीबीएस होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन संशयित जीबीएस रुग्णांचे नमुने कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी पॉझिटिव्ह आढळले, तर खासगी रुग्णालयातील आणखी दोन रुग्णांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये या चाचण्या करण्यात आल्या.

पूना रुग्णालयातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अमीत द्रविड म्हणाले, "या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे हजाररुग्णांपैकी एका प्रकरणात जीबीएस होतो. एवढ्या मोठ्या संख्येने जीबीएस रुग्ण म्हणजे शहरात अतिसाराचे हजारो रुग्ण असण्याची शक्यता आहे. पाण्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यासाठी पालिकेने केलेल्या नियमित क्लोरिनेशन प्रक्रियेस कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीने जीवाणूने प्रतिकार क्षमता विकसित केला आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंग करण्याची तातडीने आवश्यकता आहे. या जीवाणूंमध्ये बदल झाला आहे की उपचारासाठी उपलब्ध असलेल्या सध्याच्या औषधाला प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे, हे तपासण्यासाठी चाचण्या कराव्या लागतील, असे ते म्हणाले.

आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या, 'दूषित पाणी किंवा अन्नामुळे हा संसर्ग होतो. नागरिकांनी घाबरून न जाता पिण्याचे पाणी उकळणे, अस्वच्छ अन्न टाळणे आणि हातांची स्वच्छता पाळणे यासह खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जून २०११ मध्ये सॅन लुईस रिओ कोलोराडो (एसएलआरसी), सोनोरा, मेक्सिको आणि युमा काउंटी, अॅरिझोना, अमेरिका येथे जीबीएसचे संशयित रुग्ण आढळले. जीबीएस ही एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते. तसेच स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे आणि कधीकधी अर्धांगवायू चा झटका येणे हे या आजाराचे सर्व सामान्य लक्षण आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर