Umarkhed News : डॉक्टर नसल्यानं गर्भवती महिलेची रुग्णालयासमोरच प्रसूती; अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू
Umarkhed Yawatmal News : रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं गर्भवती महिलेची रुग्णालयाच्या दारातच प्रसूती झाली, वेळेवर उपचार न मिळाल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.
Umarkhed Yawatmal News : काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मोखाड्यात गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी तीन किलोमीटर पायी जावं लागल्यानं तिच्या जुळ्या मुलांचा मृ्त्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता यवतमाळ जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. गर्भवती महिलेला आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळं नवजात बाळाला गमवावं लागलं आहे. त्यामुळं या घटनेनं यवतामाळ जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातल्या विडुळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. महिलेला तात्काळ उपचाराची गरज असतानाही आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपस्थित नव्हते, त्यामुळं आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती झाली, परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्यानं महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय झालं?
उमरखेड तालुक्यात शुभांगी हाफसे ही गर्भवती महिला प्रसूतीसाठी माहेरी आली होती, तिच्या पोटात कळा येत असल्यानं महिलेच्या वडिलांनी १०८ या नंबरवरून रुग्णसेवेसाठी फोन केला, मात्र दोन तास वाट पाहूनही रुग्णवाहिका वेळेवर पोहचू शकली नाही, त्यामुळं हाफसे कुटुंबियांना गर्भवती महिलेला रिक्षात बसवून विडुळच्या आरोग्य केंद्रात न्यावं लागलं, परंतु तिथं कोणताही कर्मचारी किंवा डॉक्टर नसल्यानं गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसवकळा होऊन प्रसूती झाली, यावेळी वेळीच उपचार न मिळाल्यानं महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.