'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातात दिसलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातात दिसलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा

'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातात दिसलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा

Nov 18, 2024 06:44 PM IST

Sharad Pawar : शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातातील बॅनरनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं.'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं हुतंय...'असं त्या बॅनरवर लिहिल्याचं दिसून आलं.

शरद पवारांच्या हातातील बॅनर
शरद पवारांच्या हातातील बॅनर

आज (सोमवार) सायंकाळी ६ वाजता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर दिवशी मतमोजणी व निकाल लागणार आहे. शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा घेतली. यादरम्यान सभेतील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

बारामती विधानसभेच्या रिंगणात काका-पुतण्यामध्ये लढत होत असून या निवडणुकीत काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. शरद पवार तसेच अजित पवारांनीही आपली शेवटची सभा बारातमीमध्येच घेऊन मतदारसंघातील वातावरण तापवलं आहे. शरद पवार यांनी युगेंद्र पवारांसाठी प्रचाराची सांगता सभा घेऊन अजित पवारांना मी तीनदा उपमुख्यमंत्री केलं, आता पुढच्या पिढीला संधी देण्याचं आवाहन जनतेला केलं. या सभेत सुप्रिया सुळे यांनी अनेक स्थानिक मुद्दे काढत अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र या सभेच्या सुरुवातीलाच एका गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटूंबीय या सभेला उपस्थित होतं. यावेळी प्रतिभा पवार यांच्या हातातील बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधले. त्यांनी एक बॅनरही झळकावला त्यावर लिहिलं होतं,  'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय' . हे पोस्टर पाहून कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केल्याचं दिसून आलं. 

प्रतिभा पवारांच्या बॅनरने वेधले लक्ष -

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातातील बॅनरनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं हुतंय...' असं त्या बॅनरवर लिहिल्याचं दिसून आलं. शरद पवारांनी शेवटच्या टप्प्यात सभांचा जो काही धडाका लावलाय त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्याचं दिसून येतंय. राज्याच्या कानाकोपऱ्यात पवारांनी सभा घेतल्या आहेत. त्यातही पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या सभांचा आकडा मोठा आहे. या बॅनर सोबतच आणखी एका बॅनरनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं, ते म्हणे ‘ सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं‘ 

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार प्रथमच यावेळी प्रचार करताना दिसल्या आहेत. आज त्या सांगता सभेलाही उपस्थित होत्या. अजित पवारांनी जाहीर सभेत तक्रार करत म्हटले होते की, प्रतिभाकाकी या आधी कधी कुणाच्या प्रचारात आल्या नाहीत. आता नातवाचा इतका पुळका का आलाय, असा प्रश्न मी त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार म्हणाले. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता प्रतिभा पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीच्या शेवटच्या सभेत हजेरी लावली. नुसताच त्या ठिकाणी हजेरी लावली नाही तर त्यांनी युगेंद्र पवार यांना आशीर्वादही दिला. 

युगेंद्र पवारांसाठी बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटूंबीय - 

युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आज संपूर्ण पवार कुटुंबीय सभेसाठी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटूंबातही उभी फूट पडल्याचं दिसत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दरम्यान, आता विधानसभा निवडणुकीत राज्यभरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होत असून सर्व मतदारसंधात शरद पवारांनी झंझावाती सभा घेतल्या आहेत. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर