Vanchit bahujan aghadi first candidate list : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार हे अद्याप जाहीर झालेलं नसताना व सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नसताना प्रकाश आंबेडकर यांनी धमाका केला आहे. आंबेडकर यांनी स्वत:च्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळं कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, ती कधी होईल याबाबत अनिश्चितता आहे. असं असलं तरी प्रमुख पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. काही फॉर्मुले समोरही येत आहेत. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ती झाल्यानंतर कोण-कोणत्या जागा लढवणार हे ठरणार आहे.
हे सगळं गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रामुख्यानं विदर्भ व मराठवाड्यातील मतदारसंघांचा समावेश असून विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. यादी जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांच्या नावांपुढं त्यांच्या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे. एका तृतीयपंथीयालाही स्थान देण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
रावेर - शमिभा पाटील
सिंदखेड राजा - सविता मुंढे
वाशिम - मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे - नीलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
साकोली - डॉ. अविनाश न्हाणे
नांदेड दक्षिण - फारुख अहमद
लोहा - शिवा नारांगळे
औरंगाबाद पूर्व - विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव - किसन चव्हाण
खानापूर - संग्राम कृष्णा माने
वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समूहातील राजकीय पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचं आम्ही ठरवलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. काही संघटनांशी आमची बोलणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत पैशाचा महापूर आला होता. विधानसभेतही तसंच होण्याची शक्यता आहे. आमच्या उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून आम्ही नावं जाहीर करत आहोत, असं ते म्हणाले.