Prakash Ambedkar On VBA And Thackeray Group Alliance : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही?, याबद्दल येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती सोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिल्याने वंचित आणि ठाकरे गटात संघर्ष होण्याची चिन्हं आहे.
माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही ठाकरे गटाशी युती केली आहे. परंतु महाविकास आघाडीत आमचा समावेश होणार की नाही, हे अजून स्पष्ट नाहीय. त्यामुळं ठाकरे गटाने येत्या १५ दिवसांत निर्णय घ्यावा, नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचाही लवकरच समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वंचितच्या मविआतील सहभागाबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी काय बोलणं झालंय, ते उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगावं. निवडणुका जवळ आलेल्या असल्याने भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आलेली असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंमुळं वंचितचा भ्रमनिरास झाला नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीतील फुटीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अजित पवार म्हणजे जे ओठात तेच पोटात असणारा नेता आहे. शरद पवारांनी जे पेरलं तेच आता उगवलं आहे. चौकशीच्या छत्रछायेखाली असलेले आमदार अजित पवारांसोबत गेलेत. परंतु राजकारणात राजकीय स्थितीनुसार तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागत असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.